तुळजापूर ( प्रतिनिधी) - वर्तमानाच्या धाकधूकीत, स्पर्धेच्या युगात बाहेरच्या जगाची बरोबरी व स्वतःची पारिवारिक जबाबदारी पार पाडताना मागे राहून गेलेला आयुष्यातला आपला सुवर्णकाळ म्हणजेच तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील संजिवनी माध्यमिक विद्यालयातील आपले शालेय जीवन आपण सहजच विसरून गेलो. शाळेचा पहिला दिवस, शाळेतल्या गमती जमती, शाळेतील मित्र, शिक्षक,बाकावर कोरलेली नावे,मधल्या सुट्टीत मित्रांसोबत एकत्र खाल्लेला डब्बा,एकमेकांच्या काढलेल्या खोड्या,शाळेतला शेवटचा दिवस हे सर्व विस्मरणात जातात. शाळेचे दिवस सरले तरीही त्या आठवणी मात्र मनाच्या कोपऱ्यात अजूनही घर करून आहेत. तो शाळेतला सुवर्णकाळ "किती छान होते ना ते दिवस? या सर्व आठवणींना उजाळा देण्यासाठी संजिवनी माध्यमिक विद्यालयातील 1987 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या बॅचमेट्सना शोधायला सुरुवात केली. यासाठी त्या बॅचमधील बापु जाधव,विष्णू ढेरे,सौ. संगिता चव्हाण, सौ.शोभा म्हेत्रे, सौ.चिञलेखा यादव,अमर दिक्षित, नारायण पवार, ॲड.अंगद पवार आदी वर्गमित्रांच्या पुढाकाराने अखेर सुट्टीचा दिवस गाठून रविवार दि. 4 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 3 या कालावधीत तब्बल 40 वर्षांनी येथील संजिवनी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात त्यावेळी शिक्षणाचे धडे देणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षक अशोक माने, विजय भांमरे, शिवाजी कोळेकर,रामचंद्र ठोंबरे,सुखदेव काकडे गुरुजणांसह हे 31 वर्गमित्र एकमेकांना भेटले. इयत्ता दहावी मधील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षकांच्या या स्नेह मेळाव्यामुळे 40 वर्षांनंतर पुन्हा शाळा भरल्याचे प्रत्येकांना भास होत होता. या स्नेह मेळाव्यास गुरुजणांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन प्रारंभ झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील प्रगतिशील शेतकरी तथा शाळेसाठी एक एकर जमीन दान देणारे दानशूर व्यक्तीमत्व हभप श्रीहरी ढेरे होते.
प्रारंभी स्नेहसंमेलनाच्या या कार्यक्रमात शिक्षकांसाठी या वर्गमित्रांनी आपली ओळख व प्रगतीचा आलेख मांडताना विद्यार्थ्यांचे नाव,आज ते कुठे आहेत,त्यांचे काम,पद, ते सध्या काय करतात याबद्दलची माहिती देण्यात येऊन या शिक्षकांमुळेच हे विद्यार्थी आज ज्या स्थानावर आहेत,ते स्थान त्यांना मिळाल्याची पावती असल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करीत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या गेट टुगेदर कार्यक्रमात विद्यार्थी,विद्यार्थीनींनी,शिक्षकांनी जुन्या आठवणी,शाळेतील गमती-जमती,मित्र अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. ज्या शाळेत वर्गमित्रांनी दहावीचे धडे गिरविले तेच विद्यार्थी-विद्यार्थिनी,त्यांचे तेच त्यावेळचे शिक्षक तब्बल 40 वर्षांनी एकत्र भेटल्यानंतर सर्वांच्या मनात शालेय जीवनाच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या.
या स्नेह मेळाव्यानिमित्त आपल्या वर्गातील 31 सवंगड्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये त्यावेळच्या 3 विद्यार्थ्यांनींचा समावेश होता. यामध्ये प्रामुख्याने
सौ.संगिता चव्हाण,सौ.शोभा म्हेत्रे, सौ.चिञलेखा यादव,
बापू जाधव, एस आर चव्हाण, सुनील स्वामी, विष्णू ढेरे, शिवाजी मोहिते,अमर दीक्षित, सूर्यकांत ठोकर,अनिल कानडे, किशोर गडदे, ॲड.अंगद पवार,विजयकुमार मस्के, विनायक मस्के, भास्कर बाळशंकर, राम ठाकरे, धनंजय इंगळे, नारायण पवार, विष्णू शिरगिरे, बिभीषण दिरगुळे, बळवंत उपासे,शहाजी सुपनार, कुमार सुपणार, अरिफ शेख, प्रकाश काकडे, सतीश शिरसागर, शरीफ अन्सारी, विष्णू सगट, विनायक मस्के यांचा समावेश होता.
गुरुजनांचा सन्मान
या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमात सर्व वर्गमित्रांनी उपस्थित सेवानिवृत्त शिक्षक अशोक माने,विजय भांमरे,शिवाजी कोळेकर,रामचंद्र ठोंबरे,सुखदेव काकडे या गुरुजनांचा शाल,श्रीफळ, व विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
वर्गमित्रांच्या वतीने शाळेस 12 व्हाईट बोर्ड भेट
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून या वर्गमित्रांनी संजिवनी माध्यमिक विद्यालयास 4×6 चे 12 व्हाईट बोर्ड भेट देण्यात आले.
स्नेह भोजनाचा घेतला आनंद
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वर्गमित्रांनी एकत्रितपणे स्नेह भोजनाचा आस्वाद घेत या स्नेह मेळाव्याची सांगता करण्यात आली.
