धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य शासनाने प्रशासनात अधिक पारदर्शकता, गतिमानता निर्माण व्हावी तसेच नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शासकीय उपक्रम व सुविधांचा थेट लाभ जनतेपर्यंत पोहोचावा,या उद्देशाने 150 दिवसांचा विशेष कृती कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमांतर्गत सर्व उपक्रम प्रभावीपणे व गुणवत्तापूर्ण रीतीने अंमलात आणण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या कुशल नेतृत्व व दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली 150 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार धाराशिव जिल्ह्यात प्रशासन अधिक सक्षम, तंत्रज्ञानस्नेही व नागरिककेंद्रित करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण प्रणाली विकसित करण्यात आल्या.यामध्ये डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड प्रणाली,तुळजाई चॅटबॉट, कल्पवृक्ष स्मार्ट जीआर प्रणाली तसेच जीवनरेखा प्रणाली या महत्त्वाच्या डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे.
या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, स्वाती शेंडे, प्रविण धरमकर, संतोष राऊत, अरुणा गायकवाड, श्रीकांत पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूम रेवैयाह डोंगरे (भा.प्र.से.), उपविभागीय अधिकारी धाराशिव ओंकार देशमुख, उमरगा दत्तू शेवाळे, कळंब गणेश शिंदे तसेच जिल्ह्यातील सर्व अधिकारी, सहायक महसूल अधिकारी, महसूल सहायक, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी ते महसूल सेवक यांनी या यशासाठी सांघिक प्रयत्न केले.या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी विशेष कौतुक केले.