भूम (प्रतिनिधी)- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भूम नगर परिषदेत जनशक्ती नगर विकास आघाडीने आपली ताकद दाखवत वाजत-गाजत भव्य रॅली काढून १४ नवनिर्वाचित नगरसेवकांनी जनतेच्या साक्षीने नगरसेवक पदाचा पदभार स्वीकारला. ढोल-ताशांच्या गजरात शहरातून निघालेल्या रॅलीने भूम शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
यावेळी पॅनल प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात यांनी, “भूम शहरातील प्रत्येक समस्या जनतेच्या अपेक्षेनुसार सोडवली जाईल, जनतेचा आवाजच आमचा अजेंडा असेल,” असे ठाम आश्वासन दिले. भाजपाचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांनीही, “१४ नगरसेवक जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहतील,” असा विश्वास व्यक्त करत जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सत्वशीला थोरात, तसेच नगरसेवक चंद्रमणी गायकवाड, अनिल शेंडगे, रुपेश शेंडगे, आबासाहेब मस्कर यांनी, “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करू,”असे आश्वासन दिले.
नूतन नगरसेवकांचा सन्मान पदभार स्वीकारल्यानंतर सर्व नूतन नगरसेवकांचा भव्य सन्मान करण्यात आला. यामध्ये – शमशाद मुजावर, शितल गाडे, चंद्रकला पवार, नवनाथ रोकडे, लक्ष्मी साठे, नुरजहा मोहम्मद मशनियार, विठ्ठल बागडे, सुनिता वीर, सुरेखा काळे, रामराजे कुंभार यांचा समावेश होता. उपस्थित मान्यवर या सोहळ्याला युवा नेते यशवंत थोरात, भारतीय जनता पार्टी भूम तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, माजी नगराध्यक्षा सुप्रिया वारे, विलास शाळू, दिलिप शाळू, जावेद शेख, बाबासाहेब वीर, चंद्रकांत माळी, सुभाष जावळे यांच्यासह भूम शहरातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर खामकर यांनी केले. भूम नगरपालिकेत नव्या वर्षाची सुरुवात ‘जनशक्ती’च्या नव्या पर्वाने होत असून, आता शहराच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
