धाराशिव (प्रतिनिधी)- मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत धाराशिव येथे रविवार, दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित केलेल्या मोफत जिल्हास्तरीय (बिगरहुंडा) सामुदायिक विवाह सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांनी दिली.
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे, माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, संजय मुंडे, धनंजय राऊत यांनी मुंबई येथे नंदनवन बंगल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निमंत्रण पत्रिका दिली. समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत विनंती केली. तसेच समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी व प्रबोधनपर उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी सोहळ्याला धाराशिव येथे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची ग्वाही दिल्याचे समितीच्या वतीने अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले समितीच्या कार्याचे कौतुक
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे न भरून येणारे नुकसान झाले होते. तेथील लोकांना या आयोजित विवाह सोहळ्यातून नक्कीच दिलासा मिळणार आहे. विवाह सोहळा आयोजित केल्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करुन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे कौतुक केले असेही समितीचे अध्यक्ष आकाश कोकाटे यांनी सांगितले.
