भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूल भूम ही शाळा शहरातील गौरवशाली इतिहास असलेली जुनी आहे. या शाळेचे विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. शाळेने अनेक विद्यार्थ्यांना जीवनात ठामपणे उभे केले आहे. इथे आहे जिव्हाळा हीच माझी शाळा या तत्त्वाने या शाळेने विद्यार्थ्यांना घडविले आहे. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक सहयोगातून शाळेच्या कंपाऊंड कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.
मध्यंतरीच्या काळात शाळा संपते की काय अशी अवस्था झाली होती. परंतु मुख्याध्यापक तात्या कांबळे यांच्या अथक प्रयत्नाने झोपडपट्टी परिसरात स्वतः कुटुंबासह राहून, सामाजिक कार्याने व सोबतच्या शिक्षकांच्या एकजुटीने शाळेचे रुपडे बदलले आहे. शाळेचा दर्शनी भाग मुख्याध्यापकांनी लोकसहभागातून किल्ल्यासारखा केला आहे. परंतु शाळेच्या मागील बाजूला कंपाऊंड नसल्याने त्यांनी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना वास्तव परिस्थिती सांगितली. तसेच त्यांचे गेट-टुगेदर कार्यक्रम आयोजित केले यातून 1987 -88 च्या बॅचने रोख 15000 रुपये मदत केली. तसेच 1993 - 94 च्या बॅचने रोख 10 हजार रुपये दिले. यामुळे शाळेच्या मागील बाजूचे कंपाउंडचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे शाळेच्या मागील बाजूने मद्यपी लोकांचा होणारा त्रास पूर्णपणे नष्ट होणार आहे. कामाचा खर्च लाखाच्या घरात आहे परंतु माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या आर्थिक सहयोगातून हे काम पूर्णच करायचे असा निर्धार मुख्याध्यापक तात्या कांबळे व सर्व शिक्षकांनी केला आहे. या कामाचे नेतृत्व हस्तकला शिक्षक कैलास शिंदे करत असून सर्व शिक्षकांची साथ त्यांना मिळत आहे. त्यामुळे सर्व माजी विद्यार्थ्यांमध्ये व पालकामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
