भूम (प्रतिनिधी)- येथील शंकरराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने मौजे वालवड, ता. भूम, जि. धाराशिव येथे “युवक जलसंधारण व्यवस्थापन व ओसाड भूमी विकास” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या युवा शिबिराचे उद्घाटन अत्यंत उत्साहात पार पडले. युवकांच्या सक्रिय सहभागातून ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन व समाजप्रबोधन साध्य करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच पांडुरंग देवळकर, उपसरपंच कृष्णा मोहिते तसेच कृषी सहाय्यक आण्णासाहेब खटाळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे हे होते. तर शंकरराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वयंसेवक थोरात आकांक्षा व म्हेत्रे समृद्धी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिप्ती गीरी यांनी केले. या शिबिराच्या समारोपप्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ. नितीन पडवळ यांनी आभार व्यक्त केली. या संपूर्ण शिबिराचे नियोजन व अंमलबजावणी साहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. नंदकुमार जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. कार्यक्रमास ग्रामस्थ, स्वयंसेवक, विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
