कळंब (प्रतिनिधी)- कळंब आगारातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा कारभार सध्या पूर्णतः विस्कळीत, मनमानी व प्रवासी विरोधी झाल्याचा गंभीर आरोप  रिपाई खरात गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी केला आहे. दि.2जानेवारी 2025 रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदनाद्वारे मागणी केली आहे.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कळंब आगार सुरू झाल्यापासून नियमितपणे चालू असलेल्या, प्रवासी संख्येने भरलेल्या व उत्पन्न देणाऱ्या कळंबनांदेड तसेच परांडा आगाराअंतर्गत चालणाऱ्या धारूरकरमाळा या महत्त्वाच्या बस सेवा कोणताही अभ्यास, सर्वेक्षण अथवा विभागीय मंजुरी न घेता अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कळंब आगाराच्या सुरुवातीपासून चालू असलेल्या कळंबनांदेड सकाळी 6.30 व 8.00 वाजताच्या या दोन अत्यंत महत्त्वाच्या बस सेवा तत्कालीन आगार प्रमुखांनी कोणतेही ठोस कारण न देता बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा निर्णय प्रशासकीय स्वेच्छाचार दर्शविणारा असून एस.टी. महामंडळाच्या नियम, धोरणे व उद्दिष्टांच्या थेट विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे.

या बस सेवा बंद झाल्यामुळे नांदेड येथील रामकृष्ण परमहंस विद्यापीठासह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, कर्मचारी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. थेट बस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना वारंवार गाड्या बदलाव्या लागत असून वेळ, पैसा व श्रम यांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे.

त्याच बरोबर परांडा आगाराअंतर्गत नियमितपणे चालणारी धारूरकरमाळा बस सेवा देखील कोणतेही समाधानकारक कारण न देता बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील विद्यार्थी, शेतकरी, कामगार, व्यापारी तसेच रुग्णांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची होती. सेवा बंद झाल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्याचा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

कळंब येथे अधिकृत बस आगार अस्तित्वात असतानाही प्रत्यक्षात प्रवाशांची अवस्था आज “बस आगार आहे, पण बस नाही” अशी झाल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. यामुळे एस.टी. महामंडळाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

या संपूर्ण प्रकरणी विभागीय नियंत्रक, धाराशिव (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) तसेच मा. जिल्हाधिकारी साहेब, धाराशिव यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाद्वारे कळंबनांदेड सकाळी 6.30 व 8.00 या दोन्ही बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू कराव्यात, तसेच परांडा आगाराअंतर्गत पूर्वी चालू असलेली धारूरकरमाळा बस सेवा त्वरित सुरू करावी आणि या मनमानी निर्णयास जबाबदार अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची विभागीय चौकशी करावी, अशी ठोस मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जर प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर प्रवासी हितासाठी व एस.टी. महामंडळाच्या नियमबाह्य कारभाराविरोधात पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपाई चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


बंद असलेल्या बस सेवा नांदेड , अक्कलकोट ,माजलगाव, पारगाव मार्गे पुणे,आंबेजोगाई शटल सेवा ,तेर मार्गे धाराशिव, खेड मार्गे धाराशिव ,जालना, शिर्डी, शेगाव यास अन्य बस मार्गावरील बस अचानक बंद केल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडत आहे.

 
Top