धाराशिव (प्रतिनिधी)-  कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक कार्यक्रमाला डॉल्बी, डीजे वाद्यांचा कर्णकर्कश व गगणभेदी दणदणाट करण्याची परंपरा सर्रास फोफावत चाललेली आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण व पर्यावरण प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढून त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. असाच प्रकार धाराशिव शहरात देखील सुरू होता. त्यामुळे संबंधित सहा डॉल्बी, डीजे वाद्य चालकांसह वाहनांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी चार डॉल्बी, डीजे वाद्य वाहनांवर प्रत्येकी 10 लाख असा 40 लाख रुपयांच्या हमी रक्षण बंद पत्रावर व अटी शर्तीवर तात्पुरते ताब्यात देण्याचा आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी. गायकवाड यांनी दि.30 जानेवारी रोजी दिले आहेत. तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्थात आरटीओ अधिकाऱ्यांनी संबंधित डॉल्बी डीजे, साऊंड सिस्टम व वाहनांवर 74 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

त्यामुळे डॉल्बी डीजे चालक व मालक यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी केली आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.6 जानेवारी 2026 रोजी धाराशिव शहरातील हजरत खॉजा शमशोद्दीन गाजी (रहे) यांच्या उरसानिमित्त धाराशिव शहरात डॉल्बी डीजे लावण्यात आले होते. मात्र या डॉल्बी चालकांनी डॉल्बींना ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात आवाज सोडल्याने संपूर्ण शहरात दणदणाट घुमत होता. त्यामुळे कारवाई करण्यात आली.  

जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. टी. गायकवाड यांनी वरील सर्व डॉल्बी व साऊंड सिस्टम आणि वाहनांवर कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वाहतूक करण्यावर कायमची बंदी घातली आहे. तसेच प्रत्येकी 10 लाख रुपये अशी एकूण 40 लाख रुपयांच्या हमी रक्षण बंद पत्रावर व अटी शर्यतीवर तात्पुरती ताब्यात दिले आहेत. विशेष म्हणजे दिलेल्या अटींमध्ये यापुढे ती डॉल्बी, डीजे व साऊंड सिस्टम आणि वाहन कोणालाही विकता येणार नाही. त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल करता येणार नाही. तसेच न्यायालय जेव्हा आदेश देईल तेव्हा त्यासंबंधी डीजे डॉल्बी चालक मालकांनी व वाहनधारकांनी हजर करावी लागणार आहेत. ते वाहन कोणत्याही बेकायदेशीर कृत्यासाठी वापरता येणार नाही. याबरोबरच त्या मालमत्तेची अर्जदारांनाच सर्व दृष्टिकोनातून देखरेख व संभाळ करावा लागणार आहे. 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली व धाराशिव उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या पथकाने केली. या पथकामध्ये धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहाळ, अक्षय दिघोळे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर माळी आणि राम कनामे यांचा समावेश होता. 

 
Top