धाराशिव (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून आज सकाळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. मंदिर संस्थानच्या वतीने हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
सकाळी ठीक ११ वाजता प्रशासकीय कार्यालयात दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उभे राहून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना नमन केले.
या कार्यक्रमास तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्यासह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध व सन्मानपूर्ण वातावरणात पार पडला.
