राजा वैद्य
धाराशिव- जिल्हा परिषद, पंचायत समिती धाराशिव यांची निवडणूक जाहीर झाली असून, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 55 जागेसाठी तर पंचायत समितीच्या 110 जागेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहेत. या निवडणुकीसाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंतची मतदार यादी वापरली जात असल्यामुळे ज्या नवीन मतदारांनी मतदानासाठी नावनोंदणी केली आहे त्यांच्या यादीची नोंद नसल्यामुळे नवीन नोंदी केलेल्या मतदारात संतापाचे वातावरण परसले आहे. या संदर्भात जि. प. निवडणूक निर्णय अधिकारी स्वामी शेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणश्चवनीला प्रतिसाद दिला नाही.
धाराशिव जिल्हा परिषदवर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना फुटीर गटाचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यानंतर बदलत्या राजकारणामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात कमजोर बनला आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये युती व आघाडीमध्ये निवडणूक होण्याची शक्यता असून, भूम, परंडा,वाशीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत स्वबळाचा नारा दिल्यास आर्श्चय वाटायला नको. कारण भूम-परंडा नगर परिषद निवडणुकीमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्व पक्षांनी मिळून आघाडी केली होती. नुकत्याच तेरणा कारखान्यावर झालेल्या शेतकरी मेळाव्यातही आमदार सावंत यांनी भाजपवर घणाघाती टिका करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तोफ डागली आहे.
जि. प. च्या जागा
जिल्हा परिषदच्या तालुकावाईज जागा पुढील प्रमाणे आहेत. धाराशिव तालुक्यात 12 जागा, तुळजापूर तालुक्यात 9 जागा, लोहारा तालुक्यात 4 जागा, उमरगा तालुक्यात 9 जागा, कळंब तालुक्यात 8 जागा, वाशी तालुक्यात 3 जागा, भूम तालुक्यात 5 जागा, परंडा तालुक्यात 5 जागा याप्रमाणे एकूण 55 जागेसाठी निवडणूक होत आहे. गेल्या वेळेसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 26 जागा, काँग्रेस 13 जागा, शिवसेना 11 जागा, भाजप 4 जागा, भापसे 1 याप्रमाणे पक्षीय बलाबल होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये फुट पडली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा गट भाजपमध्ये गेल्या आहे.
