धाराशिव (प्रतिनिधी)- मागील वर्षी जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.ग्रामीण रस्ते व पुल मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाले. शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी आणि जिल्ह्यात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. असे स्पष्ट करून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ग्वाही दिली. यावेळी सन 2026- 27 च्या 319 कोटी 67 लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास यावेळी मंजुरी देण्यात आली.
पालकमंत्री सरनाईक यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. यावेळी अध्यक्षस्थानावरून सरनाईक बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समिती सभागृह धाराशिव येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांची,व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांची पालकमंत्री यांच्या दालनात तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक रितू खोखर,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी खासदार राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी विविध कामासंदर्भातील माहिती देवून निधीची मागणी केली. जिल्हाधिकारी पुजार, जिल्हा नियोजन अधिकारी गोडसे यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 च्या माहे डिसेंबर 2025 अखेर झालेल्या खर्चाची माहिती दिली.
म्युझिकल फाउंटन उभारणार
पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, जिल्ह्यात वनाच्छादित क्षेत्र कमी आहे. ते वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी पुजार यांनी मागील वर्षी पुढाकार घेऊन हरित धाराशिव मोहिमेअंतर्गत एकाच दिवशी 15 लक्ष वृक्ष लागवड मोहीम यशस्वी केली.सर्व रोपे आज जिवंत आहेत.त्याचे संगोपन करण्यात येत आहे.यावर्षी देखील या मोहिमेसाठी निधी उपलब्ध करून देऊन वृक्ष लागवड करण्यात येईल. पूर परिस्थितीमुळे जे रस्ते व पूल खराब झाले आहेत, त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत. नाविन्यपूर्ण योजनेतून नळदुर्ग किल्ल्यात म्युझिकल फाउंटन, विठ्ठलाची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास स्क्रीनच्या दाखविण्यात येईल.तसेच धाराशिव शहराजवळील हातलाई तलाव येथे म्युझिकल फाउंटन व विठ्ठलाची मूर्ती बसविण्यात येईल. तसेच तुळजापूर पाचुंबा लेक येथे वॉटर स्पोर्ट व विठ्ठलाची 51 फुटाची मूर्ती व म्युझिकल फाउंटन लावण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल, शहरातील खुल्या जागेवर धर्मवीर आनंद दिघे ट्रॅफिक गार्डन उभारण्यात येऊन तिथे ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व विरंगुळा व्यवस्था होईल.असे ते म्हणाले.

