तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील कुलदीप मगर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच कोणत्याही राजकीय दबावाखाली येऊन निर्दोष व्यक्ती, विशेषतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे यांचे नाव गुन्ह्यात विनाकारण घेऊ नये, अशी मागणी भाजपच्या शेकडो महिला-पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. शुक्रवार, दि. 19 डिसेंबर रोजी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांना निवेदन दिले. निवेदन स्वीकारताना पोलीस निरीक्षक मांजरे यांनी, “घटनेतील सत्यता पडताळून योग्य ती कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गुरुवारी पुरवणी जबाब नोंदवून घेतले जात नसल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यानंतर शुक्रवारी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विनोद गंगणे यांचे नाव गुन्ह्यात घेऊ नये, यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेत निवेदन दिले. त्यामुळे या प्रकरणामुळे तुळजापूर पोलीस ठाणे सध्या चर्चेत असून पोलिसांसाठी ही मोठी कसोटी ठरणार आहे.
तसेच या घटनेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे यांचे राजकीय विरोधक त्यांचे नाव गुन्ह्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत, घटनेच्या दिवशीच्या परिस्थितीची सखोल चौकशी करून निर्दोष व्यक्तीचे नाव गुन्ह्यात घेऊ नये, अशी विनंती पोलिसांना करण्यात आली आहे. हे निवेदन अर्चनाताई गंगणे, भाजप तालुकाध्यक्ष आनंद कंदले, माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर, सचिन रोचकरी, विशाल छत्रे, नरेश अमृतराव, औंदुबर कदम, राहुल भोसले, संदीप गंगणे, लखन पेंदे, शांताराम पेंदे, किशोर साठे, विशाल रोचकरी, आबा रोचकरी, गोपाळ पवार, राजेश्वर कदम, सोनू भिंगारे, चंद्रशेखर भोसले यांच्यासह अनेक महिला व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिले.