उमरगा (प्रतिनिधी)- शहरालगत बाह्यवळण रस्त्यावरील कोरेगावकडे जाणाऱ्या पुल दुरुस्तीच्या मागणीसाठी शनिवार दि. 6 डिसेंबर रोजी दुपारी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी पुलात साचलेल्या गाळमिश्रत पाण्यात तब्बल तीन तास बसून आंदोलन केले. अखेर महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.
शहरालगत राष्ट्रीय महामार्गावर बाह्यवळण मार्गावर कोरेगाव कडे जाणाऱ्या पुलाखाली गेल्या आठ महिन्यांपासून पाणी साचले आहे. यामुळे दररोज शहरात येणारे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी तसेच विविध कामांसाठी येणारे नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. वाहन चालवताना वाहन चालकाना कसरत करावी लागत आहे. साचलेल्या गाळमिश्रीत पाण्यातून मार्ग काढताना वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत.
याबाबतीत संबंधित विभागाला अनेक वेळा निवेदने देण्यात आली. मात्र यावर संबंधित विभागाने कसलीही कारवाई केली नाही. त्यानुसार आमदार प्रवीण स्वामी यांनी शनिवारी दुपारी बारा वाजता उमरगा शहराचा बायपास रोड खालून कोरेगावकडे जाणाऱ्या पुलाखालील रस्त्यावर साचलेल्या गाळमिश्रत पाण्यात ठिय्या मांडला. अखेर तीन तासांनंतर संबंधित विभाग आमदार आंदोलन करीत असल्याची दखल घेत तत्काळ सदरच्या पुलाचे काँक्रीट काम सुरु करून येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शिवसेनेचे डॉ अजिंक्य पाटील, सुधाकर पाटील, रणधीर पवार, धिरज बेळंबकर, डि के माने, अशोक मिरकले आदिसह शिवसेना पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
