धाराशिव (प्रतिनिधी)- देशाचा आर्थिक विकास घडवून आणायचा असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातील माणूस केंद्रबिंदू माणून त्याच्या आर्थिक कल्याणाचा विचार केला आहे. शेती, उद्योग, मजूर, रुपयाची समस्या अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले आर्थिक विचार मांडलेले आहेत. देशाचा खऱ्या अर्थाने विकास करावयाचा असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे यांनी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर उप परिसर धाराशिव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर उप परिसर धाराशिव येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उप परिसराचे संचालक प्रोफेसर डॉ. प्रशांत दीक्षित हे होते. त्यांनी अध्यक्षीय म्हणून व्यक्त करताना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते, तर ते बहुआयामी व्यक्तिमत्व होते. पत्रकारिता,राजकीय क्षेत्र,अर्थशास्त्र, समाजशास्त्र, विधीतज्ञ अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास विभागाद्वारे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विश्वास कांबळे यांनी केले. तर आभार विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. गणेश शिंदे यांनी मानले. याप्रसंगी सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम विद्यापीठ उप परिसराचे संचालक प्रोफेसर डॉ.प्रशांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
