धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर, कल्याण या प्रस्तावित महामार्गाच्या मार्गरेषेत आवश्यक बदल करण्यात यावा. हा महामार्ग धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातून पुढे जावा, अशी ठोस मागणी रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. कळंब आणि परिसराच्या भौगोलिक आणि अभियांत्रिकी दृष्टीने सखोल विचार करता हा मार्ग अधिक व्यवहार्य, किफायतशीर ठरणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक मदत होणार आहे. त्यामुळे प्रस्तावित लातूरकल्याण महामार्ग धाराशिव जिल्ह्यातूनच नेण्यासाठी प्रयत्नांना वेग देण्यात यावा या संदर्भात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालकांची यांच्याशी संवाद साधला. यावेळी तांत्रिक बाबींवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कळविले आहे.

तांत्रिकदृष्ट्या पाहता कळंब तालुका हा अन्य भूभागांच्या तुलनेने सपाट आहे. त्यामुळे कट-फिल कामाचे प्रमाण याठिकाणी कमी आहे. परिणामी मर्यादित भूसंपादन आणि मोठ्या तसेच उड्डाणपुलांची आवश्यकता कमी भासेल. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च नियंत्रणात राहून कामाची गती वाढण्यास मदत होईल.तज्ज्ञांच्या प्राथमिक अभ्यासानुसार कळंब तालुक्यातून मार्ग गेल्यास महामार्गाची एकूण लांबी सुमारे 15 ते 20 किलोमीटरने कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी लातूर ते कल्याण प्रवासाचा कालावधीही अंदाजे 30 ते 45 मिनिटांनी कमी होणार आहे. सरळ, वेगवान व सिग्नल-फ्री मार्गामुळे इंधन खर्चात देखील 8 ते 12 टक्क्यांपर्यंत बचत अपेक्षित आहे. अवजड वाहतूक, मालवाहतूक व लॉजिस्टिकसाठीही हा मार्ग अधिक किफायतशीर ठरणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तपशीलवार सांगितले.


हा महामार्ग धाराशिव जिल्ह्याला विकासाची नवी दिशा देणारा ठरणार आहे. महामार्ग धाराशिव जिल्ह्यातून गेल्यास लातूर, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईठाणेनवी मुंबई या आर्थिक केंद्रांशी थेट व जलद आणि थेट संपर्क निर्माण होईल. परिणामी शेतमालाला मोठ्या बाजारपेठेत जलद प्रवेश मिळणार आहे. उद्योग आणि वेअरहाऊसिंग तसेच सेवा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होईल जेणेकरून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी आपल्या गावाशेजारी उपलब्ध होतील. कळंबसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या आर्थिक घडामोडींना त्यामुळे मोठी चालना मिळेल. या महत्त्वाच्या मार्गबदलासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सकारात्मक व निर्णायक पाठिंबा मिळेल, असा ठाम विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. लातूरकल्याण महामार्ग धाराशिव जिल्ह्यातूनच जावा, यासाठी आपले आग्रही प्रयत्न सुरू आहेत आणि जिल्ह्याच्या हिताचा निर्णय निश्चितपणे होईल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

 
Top