भूम (प्रतिनिधी)-  सर्वसामान्य नागरिक हा पोलीस स्टेशनकडे येण्यास कायम भितो. कारण पोलीस स्टेशन हे त्रासदायक असते. पोलीस निष्कारण त्रास देतात. हा समाजातील सर्वसामान्य घटकाचा गैरसमज आहे. भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी मात्र जनसामान्यातील हा गैरसमज दूर करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या भिंती बोलक्या केल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

भूम पोलीस ठाणे मध्ये या झालेल्या बदलामुळे तसेच पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी कर्मचाऱ्यांना केलेल्या सूचनांमुळे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच खोटे नाटे  गुन्हे देखील नोंद होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भूम पोलीस ठाण्याच्या इमारतीचे सध्या बांधकाम प्रगतीपथावर आहे. नवीन पोलीस ठाण्याची इमारत होईपर्यंत पोलिसांचे निवासस्थान असणारे इमारतीमध्ये पोलीस ठाणे थाटले आहे. याच इमारतीला श्री कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच भिंती विविध सुविचाराने रंगविण्यात आलेल्या आहेत. पोलीस ठाण्यामध्ये प्रवेश करतानाच डाव्या हाताला सर्वसामान्य नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांचा रंगरंगोटी केलेला फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेतो. तसेच उजव्या हाताला स्मार्ट पोलीस कोणाला म्हणायचे याचा अर्थ लिहिलेला आहे. तसेच पोलीस ठाण्याच्या संरक्षण कठड्यावर विविध प्रकारचे वाक्य रंगविले आहेत. त्यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस ठाण्यामध्ये येणारे नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिक यांचे संबंध दर्शविणारे अर्थबद्ध वाक्य या भिंतीवर लिहिलेले आहेत. तसेच या पोलीस ठाणे मध्ये जे कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांना देखील प्रत्येक महिन्याला पोलीस निरीक्षकांच्या वतीने पोलीस ठाणे पातळीवर पुरस्कार दिला जात आहे. 


गैरसमज दूर करण्यासाठीच

पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रतिमा कायम मारझोड करणारे किंवा शिवीगाळ करणारे अशा पद्धतीची समाजामध्ये रंगवली गेली आहे. मात्र प्रत्यक्षात हे अधिकारी किंवा कर्मचारी तशा पद्धतीचे नसतात. समाजातील पोलीस दलाबाबत असणारा गैरसमज दूर करण्यासाठीच हा छोटासा प्रयत्न केलेला आहे.

श्रीगणेश कानगुडे, पोलीस निरीक्षक भूम पोलीस ठाणे.


 
Top