धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजवादी नेते साथी पन्नालाल सुराणा यांना धाराशिव प्रशालेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शनिवारी (दि. 6) धाराशिव प्रशालेच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरविंद गोरे, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, छत्रपती शिवाजी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एम. डी. देशमुख, जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समितीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव, सचिव दिलीप गणेश, ॲड. सुग्रीव नेरे, ॲड. चित्राव गोरे, ॲड. निलेश बारखेडे, राष्ट्र सेवा दलाचे अजय वाघाळे, डीसीसी बँकेचे माजी कार्यकारी संचालक हणमंत भुसारे, सिद्धेश्वर बेलुरे, विलास वकील, गुंडू पवार, बालाजी जाधव, बिभीषण कुदळे, मुख्याध्यापक पंडित जाधव, उषा माने, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अब्दुल लतिफ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी साथी पन्नालाल सुराणा यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समितीचे सचिव दिलीप गणेश यांनी धाराशिव प्रशाला उभारणीच्या कामात साथी पन्नालाल सुराणा यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करताना त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेळके यांनी साथी पन्नालाल सुराणा यांच्या कार्याचा आदर्श घेऊन देहदानाचा संकल्प केला. प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय वाघाळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक रमण जाधव यांनी केले. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
