कळंब (प्रतिनिधी)-  परम पूज्य जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा दिनांक ६ व ७ डिसेंबर २०२५ रोजी ज. न. म. संस्थान, उपपीठ मराठवाडा श्रीक्षेत्र माऊली माहेर सीमूर गव्हाण तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा उत्साहात पार पडला. 

सर्वप्रथम रामानंदाचार्यजींचे यजमानाच्या हस्ते शोडशोपचार पाद्यपूजन व सुवासिनींकडून औक्षण करण्यात आले. प. पू. रामानंदाचार्यजी यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी असे सांगितले की,  परब्रह्म हा निर्गुण आहे, त्याला जाणण्यासाठी ज्ञानचक्षू जागृत करावे लागते. अध्यात्मात उतरल्यावर बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध हे टप्पे कसे अनुभवास येतात हे त्यांनी साध्या शब्दांत समजावले. सिद्ध अवस्था मिळाल्यावर “तत्व मसी, अहं ब्रह्मास्मि” या वेदवचनाचा खरा बोध होतो, ते पुढे म्हणाले की मनुष्यजन्म हा अपार्थिव संधी आहे. आपण का आलो, हा जन्म काय सांगतो हे शोधणं गरजेचं आहे. पशू जन्माला येतात आणि जगतात, पण मनुष्यजन्म कर्मयोनी असल्याने येथेच कर्म करून परमार्थ आणि उन्नती शक्य होते.

 तुकडोजी महाराजांच्या वचनांचा दाखला देत रामानंदाचार्यजी म्हणाले, संसारही सांभाळा आणि भक्तीही करा. “संसार करून परमार्थ करावा” ही संतांची शिकवण आजही तितकीच खरी आहे.

जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाचा अर्थ सांगताना रामानंदाचार्यजी म्हणाले— “जन्माचे जे मूळ पाहिले शोधून | दुःखाची कारण जन्म घ्यावा |रजतमसत्व आहे ज्याच्या अंगी | याच गुणी जगी वाया गेला ||” या अभंगातून तुकोबारायांनी मनुष्यजन्माचा हेतू स्पष्ट केला आहे.

भाविकांच्या समस्या ऐकून रामानंदाचार्यजी म्हणाले की दुःख येणं नैसर्गिक आहे, पण अनियोजन ही मोठी समस्या आहे. आपण आयुष्यात नियोजन नाही करत, म्हणून त्रास वाढतो. “मी तुम्हाला फक्त चॉकलेट देतो, समस्या तुम्हीच सोडवता”—असं त्यांनी विनोदी शैलीत सांगितलं. समस्या निवारणासाठी रामानंदाचार्यजींनी सुचवले की दररोज दहा मिनिटे भक्ती करणे हा मनाचा व्यायाम आहे. मन शुद्ध झाल्यावरच भक्तीची खरी अनुभूती मिळते. नामदेवांच्या ओवीचा दाखला देत—

“जैसे गंगा वाहे तैसे ज्याचे मन |

भगवंत जाणं त्याच्या जवळी ||”

भक्तीमुळे एकाग्रता, संयम आणि योग्य नियोजन क्षमता वाढते, असे त्यांनी सांगितले.

 भाविकांना मार्गदर्शन करताना रामानंदाचार्यजी म्हणाले की “तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा,” आणि रोज दहा मिनिटे भक्ती करण्याचे पथ्य पाळा. ते सेवा करताना कुणाची जात, धर्म, पद-प्रतिष्ठा पाहत नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

संस्थेमार्फत चालणाऱ्या समाजकार्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की राज्यभर 52 ॲम्बुलन्स सेवा कार्यरत असून आजवर लाखो लोकांना व्यसनमुक्ती मिळाली आहे. तसेच रक्तदान, वृक्षारोपण, blood in need, वेद पाठशाळा यांसारखे अनेक सेवा प्रकल्प सातत्याने राबवले जात आहेत.

दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमामुळे भाविकांच्या मनात भक्ती, अध्यात्म व योग्य जीवननियोजनाविषयी नवी ऊर्जा निर्माण झाली. रामानंदाचार्यजींच्या बोलीभाषेतील साध्या पण प्रभावी उपदेशामुळे भाविकांना त्यांच्या समस्यांकडे पाहण्याची नवी दिशा मिळाली.

सदर कार्यक्रमाला हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार मा.श्री. बाबुराव पाटील कोहळीकर साहेब, नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंडारकर साहेब, परभणी जिल्हा परिषद सदस्य ॲड श्री दशरथ सरवदे हिंगोली पंचायत समिती सभापती श्री संजय नागरे, श्री नितीन चित्ते नगरसेवक संभाजीनगर, श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर जिल्हा परिषद, उमाकांत भोकरे नगरसेवक हदगाव,  इत्यादी मान्यवरांनी यांनी रामानंदचार्यजींचे शुभाशीर्वाद घेतले. सदर कार्यक्रमांमध्ये ७६२ भक्तगणांनी उपासक दीक्षा व ७१८ भक्तगणांनी साधक दीक्षा घेतली. परिसरातील अनेक ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वचनांचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमांमध्ये १० ते १५ हजार भाविक भक्तगण उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीठ समिती, जिल्हा समिती, तालुका समिती, सेवाकेंद्र समिती, महिला सेना, हिंदू संग्राम सेना, युवा सेना, आश्रम सेवा समिती यांनी प्रचंड मेहनत घेतली. अशी माहिती पीठ प्रमुख जयप्रकाश लोणारी, पीठ सहप्रमुख विजय देशपांडे, पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे यांनी दिली.

 
Top