धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव रेल्वे स्थानकावरून मुंबई, पुणे, कोल्हापूर यासह काही साप्ताहिक लांब पल्याच्या गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. अशातच दिनांक 13 डिसेंबर पासून धाराशिवमार्गे आणखी एक साप्ताहिक रेल्वे सुरू करण्यात आली आहे. मात्र धाराशिववरून जात असणाऱ्या या लांब पल्ल्याच्या गाडीला धाराशिवमध्येच थांबा दिला नसल्यामुळे यामुळे वाद निर्माण झाला होता.

दिनांक 10 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत धाराशिव आणि लातूरमार्गे नवीन पंढरपूर ते तिरुपती ही साप्ताहिक रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या रेल्वेला धाराशिवमध्ये थांबा देण्यात आलेला नव्हता. या प्रकरणात धाराशिव येथील राजकीय नेत्यांनी आणि प्रवाशांनीही या गाडीला धाराशिवमध्ये थांबा द्यावा अशी मागणी केली होती. तसेच बार्शी येथील रेल्वे प्रवासी सेलच्या वतीनेही या साप्ताहिक रेल्वेला बार्शी आणि धाराशिवमध्ये थांबा द्यावा अशी विनंती करण्यात आली होती. अखेर रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य करून बार्शीसह धाराशिव रेल्वे स्थानकावर देखील या रेल्वेला थांबा देण्याचे मान्य केले. त्यामुळे धाराशिव येथील प्रवाशांना तिरुपतीला जाण्यासाठी रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

गाडी क्रमांक 07013 ही रेल्वेगाडी पंढरपूर येथून दर रविवारी रात्री आठ वाजता सुटणार आहे. ही रेल्वे गाडी धाराशिव येथे रात्री 10 वाजता येणार आहे. तर पुढे तिरुपती येथे ही गाडी सोमवारी रात्री 10.30 वाजता पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात ही गाडी तिरुपती वरून दर शनिवारी सायंकाळी 4.40 वाजता निघणार आहे. पुढे ही गाडी काचीगुडा, सिकंदराबाद, बिदरमार्गे लातूर आणि पुढे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4.30 वाजता धाराशिव येथे पोहोचणार आहे. या गाडीने धाराशिववरून तिरुपती हा प्रवास 24 तासांचा असणार आहे. या साप्ताहिक गाडीमुळे धाराशिव जिल्ह्यातील भाविकांना तिरुपती बालाजीला दर्शनाला जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध झाल्यामुळे आता सोलापूरला जाण्याची गरज नाही. कालपासून म्हणजे दिनांक 13 डिसेंबरपासून ही रेल्वेसेवा सुरू झाली असून काल पहिली गाडी पंढरपूरहुन तिरुपतीला सोडण्यात आली आहे.

 
Top