धाराशिव (प्रतिनिधी)- मतदानाअगोदर एक्झिट पोल प्रसारिकत केल्याप्रकरणी सोशल मिडियावरील तीन पेजवर सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी युवा सेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता.
सध्या धाराशिव नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्न करत आहेत. मात्र काही समाजमाध्यमांवर मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी 2 डिसेंबरला मतदान झाले. मात्र तत्पूर्वी 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास धाराशिव 2.0, जिल्हा धाराशिव आणि ऑल अबाउट धाराशिव या सोशल मीडियावरील तीन पेजवर बनावट एक्झिट पोल प्रसारित करण्यात आला. यामध्ये एका राजकीय पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला निवडून येणार असल्याचे दाखवण्यात आले होते. युवा सेनेचे तालुकाप्रमुख राकेश सुर्यवंशी यांनी या संदर्भात अर्ज दिला होता. यावरून मीडिया सर्व्हिलियन्स कक्षाचे संनियंत्रण अधिकारी विश्वंभर सोनखेडकर यांच्या फिर्यादीवरून तीन पेजवर गुन्हा नोंद केला.