भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील आष्टा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच दैनिक चालूवार्ता, धाराशिवचे उपसंपादक नवनाथ गोरख यादव यांची दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी राज्य रक्षक संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र पोलीस मित्र समितीच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य रक्षक संघाच्या माध्यमातून कार्यरत असलेली महाराष्ट्र पोलीस मित्र समिती ही मागील अनेक वर्षांपासून राज्यभर सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असून, सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याबरोबरच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कर्तव्यामध्ये सहकार्य करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.
राज्यात पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने पोलीस मित्र समितीचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याच अनुषंगाने विविध पदांवरील निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र समितीचे राज्याध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते नवनाथ यादव यांना अधिकृत निवडीचे पत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले. पोलीस मित्र समितीचे सामाजिक कार्य गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय ठरत असून, पोलीस प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील विश्वासाचा भक्कम सेतू म्हणून या समितीकडे पाहिले जाते.
यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना जिल्हा अध्यक्ष नवनाथ यादव म्हणाले की, “आगामी काळात धाराशिव जिल्ह्यात जिल्हा, तालुका तसेच गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात पोलीस मित्रांची नेमणूक करण्यात येणार असून, समाजहितासाठी पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधत प्रभावीपणे कार्य केले जाईल. ही निवड म्हणजे नवनाथ यादव यांच्या सामाजिक कार्याची पोचपावती असून, त्यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस मित्र समितीच्या कार्याला नवी दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
