धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत 2 डिसेंबर रोजी शहरात मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमुळे तीन जागांवर (प्रभाग क्र. 2 अ, 7 ब आणि 14 ब) निवडणुका स्थगित झाल्या होत्या. या तिन्ही प्रभागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून 4 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. शहरातील 38 सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक पूर्ण झाल्यानंतर आता धाराशिवकरांचे लक्ष स्थगित झालेल्या या तीन जागांकडे लागले आहे.
सुधारित निवडणूक कार्यक्रम (धाराशिव – 3 जागा)
निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख : 4 डिसेंबर 2025, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक : 10 डिसेंबर 2025 (दुपारी 3.00 वाजेपर्यंत), निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी : 11 डिसेंबर 2025, आवश्यक असल्यास मतदानाचा दिवस : 20 डिसेंबर 2025 (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30), मतमोजणी व निकाल : 21 डिसेंबर 2025 (सकाळी 10.00 पासून), शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याची तारीख : 23 डिसेंबर 2025
नवीन उमेदवारांना उमेदवारीची संधी मिळणार का?
2 डिसेंबरला 38 जागांसाठी झालेल्या मतदानासोबतच 20 डिसेंबरच्या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्र केली जाणार आहे. यामुळे सर्वांचे लक्ष या तीन प्रभागांच्या निवडणुकीतील उमेदवारी प्रक्रियेवर केंद्रीत झाले आहे.
निवडणूक विभागाच्या माहितीनुसारनवीन कार्यक्रमात नवीन उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. जुन्या उमेदवारांचे वैध अर्जच कायम राहणार असून तेच उमेदवार निवडणूक प्रक्रियेत राहतील. मात्र ज्यांना आपली उमेदवारी मागे घ्यायची आहे, त्यांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली आहे. 2 डिसेंबर रोजी धाराशिव नगरपालिकेत केवळ 61% मतदान झाले असून, ही टक्केवारी जिल्ह्यातील इतर सात नगरपालिकांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे 21 डिसेंबर रोजी लागणारा अंतिम निकाल कोणत्या दिशेने झुकणार? याकडे नागरिकांचे व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
धाराशिवप्रमाणेच उमरगा नगरपालिकेतील 3 जागांसाठीदेखील 20 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.