धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव,दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह विमानतळ रोड आळणी येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. 

हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश श्रीमती भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देवदत्त गिरी यांनी भूषविले. तसेच सचिदानंद बांगर (वै.सा.का.,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव),डॉ.निखील नवले (न्यूरोलॉजिस्ट),सरकारी वकील ऍड. गुंड, ॲड.गोरख कस्पटे, स्वामी समर्थ मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक ऍड. गाडे, शकील शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मतिमंदतेचे जनक म्हणून ओळखले जाणारे जीन मार्क इटार्ड यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर बालगृहातील मुलींनी मंगल स्वागतगीत सादर केले आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. गेल्या सहासात वर्षांपासून बालगृहातील मुलींना विनामूल्य वैद्यकीय सेवा देणारे डॉ.निखील नवले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळजाई प्रतिष्ठानचे सचिव शहाजी चव्हाण यांनी केले. यानंतर सचिव भाग्यश्री पाटील यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा मोफत टोल फ्री क्रमांक 15100,बौद्धिक व मानसिक विकलांगांसाठीचा 14446,तसेच बालकांसाठीची मदतवाणी 1098 या महत्वाच्या सेवांची माहिती देत दिव्यांगांच्या हक्क व कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन रूपाली कांबळे यांनी केले. तर आभार निकिता माने यांनी मानले.


 
Top