धाराशिव (प्रतिनिधी)- पाडोळी (आ.) सह जिल्ह्यातील ग्रामीण प्रवासी व विद्यार्थ्यांना वेळेवर बससेवा उपलब्ध करून देण्याबाबत रूपामाता फाऊंडेशनच्या वतीने आगार व्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळ, धाराशिव यांना निवेदन देण्यात आले. रूपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक तथा फाऊंडेशनचे सचिव अँड. अजित गुंड-पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले.
पाडोळी (आ.) गावासाठी वेळेवर बस न सुटल्याने दि. 11 रोजी धाराशिव बसस्थानकात नागरिक व विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केल्याची गंभीर बाब निवेदनात नमूद करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व जि. प.चे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष मा. श्री. सुधाकर गुंड गुरुजी यांनी केले होते. ग्रामीण भागात बससेवा वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे अँड. गुंड-पाटील यांनी सांगितले. परिवहनमंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी आगार व्यवस्थापक बालाजी भांगे यांनी निवेदन स्वीकारून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी अनिकेत नवले, गजानन पाटील यांच्यासह आगारातील अधिकारी उपस्थित होते.
