धाराशिव, (प्रतिनिधी)-  नागपूर हिवाळी अधिवेशनात 12 डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील 4 तहसिलदार, 4 मंडळ अधिकारी व 2 ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर गौण खनिजप्रकरणात तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईचा महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्या धाराशिव शाखेने निषेध केला आहे. तसेच याप्रकरणी पुणे जिल्हा संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यात येत असल्याचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.

विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांना बाजू मांडण्याची कोणतीही संधी न देता अथवा चौकशी अहवालाची शहानिशा न करता थेट निलंबन म्हणजे नैसर्गिक न्याय तत्त्वाचे उल्लंघन आहे. रात्रंदिवस काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे अशा प्रकारे खच्चीकरण झाल्यास प्रशासन चालविणे कठीण होईल. महसूल विभागातील तहसिलदार, नायब तहसिलार व कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक प्रश्न, वेतनत्रुटी आणि संरक्षणाचे मुद्दे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वारंवार विनंत्या करूनही कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. परंतु कारवाई करताना दाखविलेली तत्परता चीड आणणारी आहे. चांगल्या कामाची दखल नाही पण न केलेल्या चुकीची शिक्षा मात्र लगेच हे धोरण संघटना खपवून घेणार नाही.

निलंबन कारवाईच्या निषेधार्थ पुणे जिल्ळा संघटनेने पुकारलेल्या कामबंद आंदोलन आणि सामूहिक रजा आंदोलनास धाराशिव जिल्हा संघटनेचा सक्रिय पाठिंबा आहे. नायब तहसिलदार यांच्या ग्रेड पे बाबतही अद्याप कारवाई झालेली नाही.त्यामुळे विधिमंडळात तहसिलदार, नायब तहसिलदार व मंडळ अधिकाऱ्यांचे झालेले एकतर्फी निलंबन मागे घ्यावे अन्यथा 19 डिसेंबरपासून धाराशिव जिल्हा संघटनेच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था अथवा प्रशासकीय अडचण निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर धाराशिव जिल्हा संघटनेच्या अध्यक्ष डॉ.मृणाल जाधव, सचिव सचिन पाटील, कार्याध्यक्ष अरविंद बोळंगे, उपाध्यक्ष संतोष पाटील, सहसचिव प्रकाश व्हटकर, संघटक विशाखा बलकवडे, कोषाध्यक्ष महादेव शिंदे, महिला प्रतिनिधी कांचन जाधव, मांजरा प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत पाटील, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरूणा गायकवाड, तहसिलदार (संगायो) डी.एफ. गायकवाड, तहसिलदार एच.ए. ढोकले (कळंब), पी.ए. म्हेत्रे (वाशी), गोविंद येरमे (उमरगा), जयवंत पाटील (भूम), नायब तहसिलदार भीमाशंकर बेरूळे (उमरगा), रतन काजळे (लोहारा), अमर आटोळे (भूम), अनिल अहिरे (लोहारा), गोकुळ भराडिया (कळंब), एम.डी. बेजगमवार (धाराशिव) यांची स्वाक्षरी आहे.

 
Top