वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील इंदापूर येथील नरसिंह भैरवनाथ सहकारी साखर कारखाना तब्बल 13 वर्षांनंतर पुन्हा कार्यान्वित झाला असून, यानिमित्ताने कारखान्यात बॉयलर पूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या कारखान्याला आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी नवसंजीवनी दिली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे परिसरातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी बोलताना व्हाइस चेअरमन केशव सावंत यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळपासाठी घेतला जाईल. असे आश्वासन दिले. तसेच यंदा विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी आमदार सावंत यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना, लवकरच त्यांच्या हस्ते मोळी पूजन कार्यक्रम होणार असल्याची माहिती दिली. यावेळी ऊसाची पहिली उचल 2800 रूपये जाहीर करण्यात आली असून, इतर कारखान्यांपेक्षा जास्त दर देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
13 वर्षांनंतर कारखाना पुन्हा सुरू झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण असून, मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ, पदाधिकारी व वाहतूक ठेकेदार या सोहळ्याला उपस्थित होते. या कारखान्याच्या पुनरुज्जीवनामुळे वाशी तालुक्याच्या शेती अर्थकारणाला नवचैतन्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
