धाराशिव (प्रतिनिधी)-  अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा प्रकाश झळकला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांची शेती, उभी पिके आणि गोठ्यातील पशुधन अक्षरशः वाहून नेले. कष्टाच्या जीवावर उभे असलेले संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाले. अशा वेळी केवळ मदतीचा शब्द नाही, तर कृतीतून 101 देशी गीर गायचे वितरण करून महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी संवेदनशीलतेचा जिवंत आदर्श घालून दिला आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत, त्यांच्या स्वखर्चातून आणलेल्या 101 उत्तम प्रतीच्या देशी ‌‘गीर' गाईंचे वितरण सद्गुरू सदानंद महाराज यांच्या शुभहस्ते मीरा भाईदर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडले. यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “अवकाळी पावसाच्या तडाख्याने धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाले. शेतीबरोबरच कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेली दूधदुभती जनावरे गमावल्यामुळे त्यांचे जीवनचक्रच थांबले. ही व्यथा स्थानिक पत्रकारांनी माझ्यापर्यंत पोहोचवताच, क्षणाचाही विलंब न करता मदतीचा निर्णय घेतला. संपूर्ण देशभरातून उत्तम प्रतीच्या देशी गाईंचा शोध घेतल्यानंतर गुजरातमधील ‌‘गीर' प्रजातीची गाय शेतकऱ्यांसाठी निवडली. प्रत्येकी सुमारे 75 ते 80 हजार रुपये किंमतीच्या या गाई महाराष्ट्रातील स्थानिक गाईंपेक्षा दुप्पट दूध देतात. सध्या देशी दुधाला चांगला दर मिळत असल्याने, या माध्यमातून शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळेल आणि त्यांच्या कुटुंबाला भक्कम आर्थिक आधार प्राप्त होईल. विशेषतः कळंब, भूम आणि परंडा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका अधिक बसल्याने, या भागातील पशुधन गमावलेल्या शेतकरी कुटुंबांना स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळावा, या उदात्त हेतूने हे गाईंचे वितरण करण्यात आले. 


 
Top