भुम (प्रतिनिधी)- लातूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय स्तरीय क्रीडा स्पर्धेत, भूम येथील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी ओमकार आत्माराम जाधव याने उल्लेखनीय कामगिरी करत गोळाफेक या स्पर्धेत 12.40 मीटर इतकी प्रभावी फेक करून प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.
ओमकारच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष जी. शिंदे सर यांनी अभिनंदन करताना सांगितले की, “ओमकार हा आमच्या महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून त्याचे हे यश आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे. तो राज्यस्तरावरही उत्तम कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करेल, असा आम्हाला विश्वास आहे. महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सोळंके यांनीही ओमकारचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व प्राध्यापकांनी ओमकारचे अभिनंदन करून त्याला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले. या यशामागे क्रीडा शिक्षक सूर्यवंशी एम. जी. सर यांचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांनीही ओमकारला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. किशोर गव्हाणे, प्रा. तानाजी बोराडे, डॉ. नितीन पडवळ, प्रा. गोकुळ सुरवसे हे उपस्थित होते.
