उमरगा (प्रतिनिधी)- राज्यात आम्ही महायुती म्हणुन सत्तेत असताना उमरगा शहराच्या विकासाठी आम्ही काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन शहर विकास आघाडी केली असल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. नवीन आमदारांनी एक वर्षात किती निधी आणला व काय कामे केली हे जनतेला सांगावे असेही ते म्हणाले.
शिवसेना काँग्रेस लहुजी शक्ती सेना रयत क्रांती व मित्रपक्ष शहर विकास पॅनलच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या “वचननामा“ प्रकाशन व पत्रकार परिषदे दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार रवी गायकवाड, शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड, माजी कृषी सभापती जितेंद्र शिंदे, काँग्रेसचे विजय दळगडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनोरे, काँग्रेसचे तालुकाप्रमुख अर्जुन बिराजदार, नानाराव भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख बळीमामा सुरवसे, शाहुराज माने, सुप्रिया घोडके, राहुल शिंदे, स्वाती स्वामी, सचिन जाधव, सोनकांबळे अश्विनी, धनंजय मुसांडे, यल्लमा विभूते आदी उपस्थित होते.
किरण गायकवाड यांनी शहरांमध्ये करण्यात येणारी विकास कामे रस्ते कचरा प्रश्न,भाजी मंडई, ट्राफिक चांगले इन्फ्रास्ट्रक्चर, लाईटचे प्रश्न, खेळाडूंसाठी क्रीडांगणे, पाणीपुरवठा, स्कायवॉक, मुख्य रस्त्यावर नियोजनबद्ध पार्किंग, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, आरोग्य केंद्र आदी विषयांचा समावेश असलेला जाहीरनामा यावेळी सादर केला. माजी खासदार रवी गायकवाड म्हणाले, जनसामान्यांमध्ये काम करायची आमची प्रवृत्ती आहे. त्यामुळे आमचे सर्व नगरसेवक निवडून येतील. महायुती मधील घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला परंतु पुढून फारसा योग्य प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी काँग्रेस पक्षाचे विजय दळगडे, जितेंद्र शिंदे यांनी यावेळी पक्षाच्या भूमिका व पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी शिवसेना काँग्रेस लहुजी शक्ती सेना रयत क्रांती तसेच मित्र पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
