धाराशिव(प्रतिनिधी) - शहरातील दत्तनगर मधील दत्त मंदिर ते इक्विटास बँक या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. विशेष म्हणजे या मंजूर रस्त्याच्या कामास कार्यारंभ आदेश देऊन दीड ते दोन वर्षाचा कालावधी झालेला आहे. मात्र अद्याप हे काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे ते काम आठ दिवसात सुरू करावे अन्यथा समता नगर शहरवासियांच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा समता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दि.4 नोव्हेंबर रोजी दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव शहरातील दत्त मंदिर ते इक्विटास बँकेकडे जाणाऱ्या रस्त्याचे हॉट मिक्स काम मंजूर करण्यात आले आहे. त्या कामाचा कार्यारंभ आदेश देऊन दीड ते दोन वर्षे पूर्ण झालेली आहेत. मात्र हे काम अद्याप सुरू केलेली नाही. ते काम सुरू करण्यात यावे या मागणीसाठी संस्थेच्यावतीने वारंवार लेखी निवेदन व तोंडी पाठपुरावा केला. मात्र, अपर जिल्हा दंडाधिकारी धाराशिव यांचे पत्र जा.क्र.2025/उपचिटणीस/एम.जी.-4/कावि-2668 दि.15/07/2025, उपविभागीय अभियंता सां.बा. उपविभाग क्रमांक 01 धाराशिव यांचे पत्र जा.क्र./ लेखा निरिक्षण/2889/दि.1607/2025 असा लेखी पत्र व्यवहार वजा आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी देण्याशिवाय दुसरे काही केलेले नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे काम येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात यावे. समता नगरवासियांच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येईल. या दरम्यान जीवितस काही बरे वाईट झाल्यास किंवा रहदारीस अडचण निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला आहे. यावर समता सहकारी गृह निर्माण संस्थेचे चेअरमन संतोष उर्फ नाना घाटगे, आयुब शेख, रामचंद्र जोशी, वासुदेव वेदपाठक, हरिदास लोमटे, आकाश लष्करे, बंटी कादरी, मंसुर शेख, वैभव गरड, रोहीत घाटगे, शैलेश काळे व रोहन घाटगे यांच्या सह्या आहेत.
