धाराशिव (प्रतिनिधी)- आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी धाराशिव शहरातील कचरा डेपो उभा केला नाही. रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे असून रस्त्यावर दिवे देखील लावलेले नाहीत. कचऱ्याचा ढिगारा ठिकठिकाणी साचलेला दिसत असून शहराला सोयीसुविधा देण्याऐवजी भकास करून टाकले आहे. त्यामुळे धाराशिव शहरातील नागरिकांना मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्यास सत्ताधारी सपशेल अपयशी ठरले असल्याचा घनघाती आरोप केला. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी धाराशिवरांनो तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या हाती सत्ता दिल्यास सर्व प्रकारच्या मूलभूत सोयीसुविधा निश्चितपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठाम आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांनी दि.26 नोव्हेंबर रोजी दिले.
वंचित बहुजन आघाडीच्या धाराशिव नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बहुजन आघाडीचे जिल्हा निरिक्षक आविनाश भोसीकर, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉ.नितिन ढेपे, महाराष्ट्र फाऊंडेशनचे अध्यक्ष मुफ्ती वसीम वल्लीमा, वंचितचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण रणबागुल, जिल्हाध्यक्ष ॲड प्रणित डिकले, जिल्हा संघटक विकास बनसोडे यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुरेखा वाघमारे, नामदेव वाघमारे, सोनल बनसोडे, जयदीप दळवे, विजयाबाई नागटिळे, शितल चव्हाण, महादेव एडके, क्षमा सिरसाटे आदी उपस्थित होते. आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, आमदार व खासदार यांना अनुक्रमे पाच व दहा कोटी रुपये वर्षासाठी विकास कामांसाठी निधी मिळतो. मात्र, नगरसेवकाला कामासाठी वर्षाकाठी 15 कोटी रुपये मिळत असल्यामुळे खासदार व आमदार यांच्यापेक्षा नगरसेवक मोठा असून त्यांची विकास कामांमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. कारण नगरसेवक हा त्या प्रभागातील गल्लीतील व दररोज त्याला माहीत असणाऱ्या समस्यांशी तो निगडित असतो. तो आपल्या खांद्याला खांदा लावून बसतो. त्यामुळे तो त्या समस्या प्राधान्याने सोडविण्यास पुढाकार घेत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या हक्काच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. शहरवासियांना 8 दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे ही बाब अत्यंत गंभीर असून आम्ही दररोज पाणी पुरवठा करु असे आश्वासन त्यांनी दिले. नगर परिषदेच्या शाळा दर्जेदार करण्यासह इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरू करणार, बगीच्या व वयोवृद्धांना बसण्यासाठी पार्क करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड प्रणित डिकले, डॉ नितीन ढेपे, मुफ्ती व नामदेव वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष ॲड. डिकले यांनी तर सूत्रसंचालन अलंकार बनसोडे यांनी व उपस्थितांचे आभार भैय्यासाहेब नागटिळे यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
