धाराशिव (प्रतिनिधी)- शहरात विविध ठिकाणी मनमानीपणे ऑटोरिक्षा व फळविक्रीचे हातगाडे लावण्याचे प्रकार वाढले आहेत. यासंदर्भात अधिक तक्रारी आल्यामुळे असा प्रकार करून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 10 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई आनंदनगर पोलिस ठाण्याकडून शनिवारी करण्यात आली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महावितरण परिसर, बसस्थानक परिसर, महात्मा बसवेश्वर चौक आदी भागात मोठ्या प्रमाणात ऑटोरिक्षाची मनमानी सुरू आहे. रिक्षाचालक थेट रस्त्यावर रिक्षा उभी करतात. असाच प्रकार हातगाडी चालकांचाही आहे. फळविक्रेते हातगाड्या थेट रस्त्यांवर उभी करतात. यामुळे अपघाताचे प्रकार वाढले आहेत. शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते येडशी रस्त्यावर, बसस्थानकासमोर व तेरणा कॉलेज ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या उभे केले आढळून आले. यावरून पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून यांच्याविरूध्द स्वतंत्र 10 गुन्हे नोंदवले आहेत.