धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख विभागाच्या मार्फत जुळे सोलापुरातील वि. गु. शिवदारे महाविद्यालयाच्या इतिहास विभागात नुकतेच दहा दिवसांचे मोडी लिपी वाचन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि इतिहास अभ्यासकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.
दहा दिवस चाललेल्या या प्रशिक्षण परीक्षेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे सहायक स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले अक्षय शहाजी साळुंखे यांनी उत्कृष्ट गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे. अक्षय साळुंखे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून, गेल्या एक वर्षांपासून ते श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात सहायक स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. कामाचा व्याप सांभाळत त्यांनी मोडी लिपीचे वाचन आणि लेखन यामध्ये प्रावीण्य मिळवले आहे.
मोडी लिपी ही महाराष्ट्राची ऐतिहासिक लिपी असून, 13 व्या शतकापासून ते 1960 पर्यंत महाराष्ट्रातील प्रशासन, न्यायप्रणाली, करप्रणाली आणि व्यापार व्यवहाराचे असंख्य दस्तऐवज या लिपीत लिहिले गेले आहेत. आजही इतिहास संशोधनात मोडी लिपीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या प्रशिक्षणाद्वारे अक्षय साळुंखे यांनी इतिहास संवर्धन आणि अभ्यासात योगदान देण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. अक्षय साळुंखे यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
