वाशी (प्रतिनिधी)- अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यामुळे वाशी तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कुटुंबांना घरगुती वस्तू, धान्य तसेच रोजच्या गरजेच्या सामग्रीच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील श्री दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील, सोशल फाउंडेशन शिरोळचे डॉ. आप्पासाहेब (सा. रे.) पाटील आणि श्री दत्त उद्योग समूह, शिरोळ यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचा उपक्रम हाती घेण्यात आला.
या मदत कार्यामध्ये वाशी येथील कै. अरुणोजिराव देशमुख यांचे जावई भवानीसिंह घोरपडे यांच्या विशेष पुढाकारातून वाशी तालुक्यातील पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ केळेवाडी खालची, केळेवाडी वरची तसेच वाशी शहरातील साठेनगर भागातील नागरिकांना मिळाला. मदत वितरण कार्यक्रमाला स्वतः भवानीसिंह घोरपडे उपस्थित होते. त्यांच्यासोबत मच्छिंद्र तात्या कवडे, विलास गोबरे, धर्मराज शिंदे, अंगद चोथवे, प्रकाश चोथवे, प्रशांत बाबा कवडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन भारती, शहाबाज काझी, नगरसेवक भागवतजी कवडे तसेच नगरसेविका अलका भालेकर यांनी पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यात सक्रिय सहभाग नोंदविला.
