धाराशिव (प्रतिनिधी)-  कळंब, वाशी आणि भूम तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. कळंब तालुक्यातील बहुतांश गावामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे तेरणा नदी पात्र सोडून ओसंडून वाहत आहे. पाण्याचा भला मोठा प्रवाह नदीपात्रा बाहेरून वाहत असल्याने सगळ्या शिवारात पाणी शिरले आहे. इटकूर परिसरातील वाशीरा नदीही पात्र सोडून एक किलोमीटर अंतरावरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या घरांचे, दुकानांचे आणि शेतशिवाराचे अतोनात नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यातील देवळाली, ढोराळा परिसरात झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेतल्या. या संकटकाळात ठामपणे त्यांच्यासोबत उभे असल्याचा विश्वास दिला. सर्वांना सरसकट मदत मिळेपर्यंत आपण पाठपुरावा करीत राहणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

शनिवारी रात्री व रविवारी पहाटे भूम, कळंब आणि वाशी तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा जोर वाढला होतो. कळंब तालुक्यातील सहापैकी चार महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. अनेक गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली नसली तरीही, स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. जवळा खुर्द गावात मुख्य रस्त्यावरून नदीप्रमाणे पाण्याचा प्रवाह वाहत आहे. चौकाला सरोवराचे रूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे गावातील दुकानांमध्ये घरांमध्ये पाणी शिरून अतोनात नुकसान झाले आहे. हे संकट खरोखर अभूतपूर्व असेच आहे. जलप्रकोप म्हणजे काय याचे अनुभूती सर्वांना येत आहे. अशा काळात आपण स्वतः जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसोबत ठामपणे उभे आहोत. कळंब तालुक्यात उडवलेल्या या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून नुकसानीची पाहणी केली. नदीकाठच्या गावांमध्ये झालेले नुकसान शब्दात सांगता येणार नाही. यापूर्वीच शेतजमिनी खरवडून गेलेली आहे. पुन्हा एकदा प्रचंड मोठा प्रवाह नदीपात्र सोडून वाहत असल्यामुळे नुकसानीची व्याप्ती वरचेवर वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाला तातडीने या सगळ्या बाबींची नोंद घेण्याचे निर्देश दिले आहेत. कागदोपत्री नियमावली बाजूला ठेवून शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी शक्यतो सर्वतोपरी बाबी करण्याचेही सांगितले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.


 
Top