तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक आपसिंगा घाटातील रस्त्याची दुरुस्ती शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर न केल्याने भाविकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या मार्गावरुन दरवर्षी हजारो भाविक पायी दर्शनासाठी तिर्थक्षेत्र तुळजापूरकडे जातात.
मात्र, जलजीवन मिशनच्या पाइपलाइनसाठी खणलेल्या खड्ड्यांतील माती रस्त्यावर टाकल्याने रस्ता अरुंद झाला असून, प्रवाशांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. आपसिंगा घाटाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. नगरहून येणाऱ्या पालख्या, तसेच भातागळी येथील शिंगणापूरहून शंभू महादेव काठीसह अनेक दिंड्या या घाटातून तुळजापूर तिर्थक्षेत्राकडे जातात. अशा मार्गाची दुरवस्था पाहता, ‘दुरुस्तीचे पैसे जातात कुठे?' असा सवाल स्थानिक भाविक आणि नागरिकांतून उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविक वर्गाने तात्काळ घाट रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
“रस्ता दुरुस्ती न झाल्याने अनेक भाविक पाय मुरगळणे, वाहनांना अडथळे, धूळ आणि अपघाताचा धोका अशा समस्यांना सामोरे जात आहेत. प्रशासन मात्र डोळेझाक करत आहे. स्थानिक नागरिक.