तुळजापूर (प्रतिनिधी)- कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या नगरीत निसर्गाने दाखवलेला हा अनोखा चमत्कार पन्नास वर्षांनंतर झालेल्या विक्रमी पावसामुळे तुळजापूर शहर व पंचक्रोशीतील प्राचीन विहिरी, आडे व कुंड अक्षरशः पाण्याने लबालब भरून वाहत आहेत.

शहराच्या मध्यवर्ती साळुंके गल्लीतील कोट्याची प्राचीन विहीर भरून रस्त्यावर पाणी वाहताना दिसत आहे. मंदिरातील श्रीकल्लोळ तीर्थकुंडातील 108 झरे प्रथमच खळखळून उघडले असून, श्रीगोमुखातून अहोरात्र दोन, अडीच इंच पाणी अखंड पडताना भाविक आश्चर्यचकित होत आहेत. कमान वेस भागातील श्री आहिल्यादेवींच्या काळातील विहीर तसेच भगवती विहीर आज पूर्ण भरून वाहत आहेत. शतकानुशतकांची ही पवित्र जलसंपदा प्रथमच एवढ्या थाटामाटात भरून ओसंडते आहे. “ निसर्गाची करणी, नारळात पाणी” या म्हणीची प्रचिती भाविकांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे. पंचक्रोशीतील इतर सर्व कुंड व विहिरींमध्येही पाणी साठा झालेला आहे. मात्र, सर्वात मोठे मानले जाणारे मंकावती कुंड हे देखभाल अभावी कचऱ्याने व जलपर्णीने भरून गेले असून आता त्यातही पाणी साठले आहे.

 
Top