धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिवला जंक्शन रेल्वे स्थानक होणार असून, हैद्राबाद, बेंगलोर, मुंबई, नागपूर, दिल्ली या शहरांकडे धाराशिवमधून रेल्वे जावू शकणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र आता लवकरच रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर झळकणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. 

धाराशिव रेल्वेस्थानक पूर्वी प्रस्तावित होते. त्यापेक्षा तिप्पट मोठे होणार आहे. पर्यायी रेल्वेमार्ग उभारला जाणार आहे. प्रवाशांसह कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकरिता अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. रस्त्यांच्या वरून आणि खालून जाणाऱ्या पुलांची संख्याही वाढविण्यात आली आहे. 

सोलापूर शहरातील जमीन रेल्वेमार्गासाठी संपादन करण्याकरिता तेथील सध्या प्रचलित असलेले दर गृहित धरण्यात येणार आहेत. वरील सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी 3295 कोटी रूपयांच्या सुधारीत आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव प्रकल्प किंमतीनुसार रेल्वे बोर्डाने निधीची तरतूद करावी, अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. त्यानुसार रेल्वे बोर्डाने 50 टक्के तरतूद केल्यानंतर उर्वरित 50 टक्के राज्य हिश्याचा वाटा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार 3295 कोटी रूपयांच्या सुधारित आराखड्यावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. एकूण 84.44 किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गासाठी 904 कोटी 92 लाख रूपयांची मंजुरी देण्यात आली होती. आता त्यामध्ये तिपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. 


यामुळे वाढला खर्च 

मुख्य रेल्वेस्थानकाची इमारत चार हजार चौरस मीटरवरून आता 12 हजार 630 चौरस मीटर होणार आहे. एकंदरीत रेल्वे स्थानकाची इमारत तिप्पट मोठी होणार आहे. वेगात जाणाऱ्या जलदगती रेल्वेगाड्यांना तत्काळ मार्ग मिळावा यासाठी आवश्यक असणारी पर्यायी व्यवस्थाही उभारली जात आहे. यार्डाच्या आवश्यकतेनुसार मोठ्या लांबीची लूपलाईनही अंथरली जाणार आहे. पूर्वी रस्त्याखालून जाणाऱ्या पुलांची संख्या 20 होती. आता त्यात वाढ करण्यात आली असून रस्त्याखालून रेल्वेमार्गासाठी 31 पूल उभारले जाणार आहेत. सेालापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात महत्वाच्या पुलाची लांबी वाढविण्यात आली आहे. 385 मीटरऐवजी हा पूल 399 मीटर एवढा लांब असणार आहे. प्रवाशांसाठी अनेक महत्वपूर्ण सोयी-सुविधांचा या आराखड्यात अंतर्भाव करण्यात आला आहे. पथमार्ग, दादरा, प्लॅटफॉर्म यासह जमिनीखाली आणि जमिनीच्या वर पाण्याच्या मोठ्या टाक्या उभारल्या जाणार आहे. त्यासाठीही दुप्पट जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची संख्या 342 वरून 373 करण्यात आली आहे. त्यासाठी सुधारित आराखड्यानुसार राज्य मंत्रिमंडळाने 3295 कोटी रूपयास मान्यता दिली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.


 
Top