धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे अत्याधुनिक बसस्थानक उभारण्याबाबत गुरूवारी (दि.16) मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या दालनात   बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ढोकी येथील बस स्थानकासाठी शिवसेनेचे (शिंदे) राज्य आंदोलन समन्वयक अ‍ॅड. तुकाराम शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने ही बैठक घेण्यात येत असल्याची माहिती अ‍ॅड.शिंदे यांनी दिली.

या बैठकीस धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे व्हीसीद्वारे सहभागी होणार आहेत. तर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक, राज्य आंदोलन समन्वयक अ‍ॅड. तुकाराम शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांचे विशेष कार्य अधिकारी दिनेश कुर्‍हाडे बैठकीच्या अनुषंगाने पत्राद्वारे संबंधितांना कळविले आहे.

ढोकी येथील गायरान किंवा कृषी विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण होत असल्याने तात्काळ बैठक घेवून या जागेवर अत्याधुनिक बसस्थानक उभारण्याकरिता बैठक घेण्यात यावी अशी मागणी अ‍ॅड. तुकाराम शिंदे यांनी केली होती. ढोकी येथे मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील 25 गावांचा दैनंदिन संपर्क या गावाशी आहे. म्हणून गट क्रमांक 35 मधील गायरान जमिनीची मागणी करून सार्वजनिक उपयोगाकरिता ही जागा मिळाणे गरजेचे असल्याचे त्यांनी परिवहन मंत्र्यांना निवेदनाद्वारे कळविले होते. त्याअनुषंगाने ही बैठक होत असल्यामुळे ढोकी येथील अत्याधुनिक बस स्थानकाचा प्रश्न बैठकीत मार्गी लागेल असा विश्वासही अ‍ॅड. शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 

 
Top