धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार कांचन जाधव आणि व्याख्याते म्हणून इतिहास संशोधक युवराज नळे, प्रा रवी सुरवसे, प्रा प्रशांत गुरव उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्राच्यविद्या संशोधक तसेच ज्येष्ठ साहित्यिक युवराज बप्पा नळे यांनी मराठी भाषेच्या अभिजाततेचा प्रवास उलगडून दाखवताना आर्यांचं भारतात आगमन, वेदांची रचना, देवनागरी लिपीची निर्मिती, इंडो-आर्यन भाषेचा वापर तसेच सिंधू खोऱ्यातील प्रगत संस्कृती आणि तिथे वापरली जाणारी भाषा यांच्या संबंधाने भाष्य केले.
तसेच त्यांनी, मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांच्या विवेकसिंधू ग्रंथाचा, मराठीला अभिजात दर्जा देताना उपयोग झाला.सातारा येथे सापडलेला मराठीतील पहिला ताम्रपट व चामुंडराय याचा श्रवणबेळगोळ येथील शिलालेख, हे मराठी भाषा प्राचीन असल्याचे अस्सल पुरावे आहेत, याही गोष्टींचा उल्लेख केला. महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात घेतलेल्या श्रमाबद्दल तसेच महाराष्ट्र शासनाने अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचे धोरण आखले याबद्दलही, युवराज बप्पा नळे यांनी शासनाचे कौतुक करत, आपण सर्वांनी माय-मराठी अवगत करावी आणि दरवर्षी अभिजात मराठी भाषा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन केले.
यावेळी सौ.जाधव मॅडम यांनी मराठी भाषा अभिजात कशी आहे किंबहुना अभिजात मराठी भाषा दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यामागील परंपरा आणि कारणे सांगितली. यावेळी बोलताना सौ.जाधव मॅडम यांनी, आपण आपली मातृभाषा अर्थात मराठी भाषा सर्वांनी, तन्मयतेने आत्मसात करावी, मातृभाषा कोणीही विसरू नये, तसेच मराठी भाषा मनामनात रुजवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले. याप्रसंगी श्री.सुरवसे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळाला यावर प्रकाश टाकला. नवीन पिढीतील युवा लेखकांनी नव्या पिढीची टेक्नोसॅव्ही भाषा अवगत करून मराठीला अधिकाधिक समृद्ध करावे, असा विचार त्यांनी यावेळी मांडला. मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांविषयी त्यांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले.