तुळजापूर (प्रतिनिधी)- तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयाचे विज्ञान विषयाचे प्राध्यापक व तुळजापूर तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार लक्ष्मण पाटील हे गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी लावण्याचे कार्य करत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी अनेक विद्यार्थी राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन करतात. शिक्षक म्हणून त्यांच्या कार्यात प्रचंड समर्पण, नवोन्मेषी अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा दिसून येतो.
ते तुळजापूर तालुका खाजगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था पुरवठा संस्थेचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. समाजहिताच्या आणि शिक्षणविकासाच्या विविध उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. हा पुरस्कार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. स्थानिक शिक्षकवर्ग, शिक्षणप्रेमी आणि सरस्वती विद्यालय परिवाराने या यशाबद्दल पाटील सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.