धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा होत आहे. त्यानिमित्ताने श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषेचे व संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या हेतूने एक पत्र आईवडीलास, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, भित्तिपत्रक स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यातीलच एक भाग म्हणून मुलांमध्ये आपल्या भावना योग्य प्रकारे मांडता याव्या तसेच आईवडीलांविषयीची कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी 'एक पत्र आईवडीलास' या उपक्रमांतर्गत श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतील इ.11वी व 12 वीच्या 563 विद्यार्थ्यांनी आईवडीलांना पत्र लिहिले.

या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य प्रा.नंदकुमार नन्नवरे हे अध्यक्षस्थानी तर कला वाणिज्य शाखा प्रमुख प्रा.कैलास कोरके, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सूर्यकांत कापसे, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.मनोज डोलारे, प्रा.सिध्देश्वर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकातून प्रा.डॉ.मनोज डोलारे यांनी मराठी मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा, अभिजात मराठी भाषा सप्ताहात मराठी विभागामार्फत मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत होणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी माहिती सांगितली. प्रा.कैलास कोरके यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात कधीच पोस्टात जाऊन पत्र आणून पत्र लेखन केले नसल्याने त्यांच्या भावनेला व कृतीशीलतेला वाव देण्यासाठी या नवोपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. तर अध्यक्षीय समारोपात प्राचार्य नन्नवरे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनानातून आपण सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवेत हे विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आईवडीलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या उपक्रमाचे कौतुकही त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात प्रथमच पोस्ट कार्डवर पत्र लिहिण्याचा एक आगळावेगळा अनुभव घेतला. आधुनिक काळात मोबाईल, इंटरनेट, ई- मेल, व्हाट्सअप, फेसबुकच्या साह्याने परस्पर मानवी संवादाच्या माध्यमामध्ये आधुनिकता आली. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पत्र आणून पत्रलेखन करणे या गोष्टी खूप दुर्मिळ होत चालल्या आहेत. पोस्ट ऑफीसमधून स्वतः पोस्टार्ड आणून पत्रलेखन करत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात प्रथमच पोस्ट कार्डच्या माध्यमातून आपल्या आईवडिलांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनी लिहिलेली ही सर्व पोस्टकार्ड पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यात आली. तेथून ते सर्व पत्र विद्यार्थ्यांच्या घरच्या पत्त्यावर रवाना झाले. या आगळ्यावेगळ्या विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमामुळे कृतीशीलतेला वाव मिळून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक प्रकारची सकारात्मकता दिसून आली. या नवोपक्रमाचे आयोजन मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.मनोज डोलारे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.

या उपक्रमासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ.प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य भैय्या पाटील, प्रशासकीय अधिकारी साहेबराव बप्पा देशमुख आदींचे सहकार्य लाभले.

या उपक्रमासाठी यशस्वीतेसाठी प्रा.दत्तात्रय जाधव, प्रा.यशवंत कोकाटे, प्रा.राज भोसले, प्रा.शंकर गोरे, प्रा.राजहंस कांबळे, प्रा.अमित लोमटे, प्रा.सौ.सविता जाधव, प्रा.सौ.सुवर्णा शेळके, श्री.अमित काकडे, शिक्षकेतर कर्मचारी पद्माकर ढेकणे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दत्तात्रय जाधव तर आभार प्रा.सूर्यकांत कापसे यांनी मानले.

 
Top