धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे उभ्या राहिलेल्या संकटाच्या काळात शासकीय मदतीबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्ती पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या आहेत.विविध पुराने बाधित गावांमध्ये अन्नधान्य,किराणा साहित्य,पशुखाद्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

धाराशिव तालुक्यातील भंडारवाडी,इर्ला व तेर येथे ज्ञानप्रबोधिनी (हराळे) संस्थेकडून 116 किट वाटप झाले.पाडोळी येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून 45 किट वाटप करण्यात आले.तर बायफ संस्थेने 100 पशुपालकांना जनावरांसाठी खनिज मिश्रण दिले. पूरामुळे बाधित भूम तालुक्यातील झालेल्या 32 गावांना पुण्यातील मराठवाडा युवा मंच संस्थेने 350 किट दिली.तसेच श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना,शिरोळ यांचेकडून 300 किट पुरवण्यात आल्या.

परंडा तालुक्यातील 25 गावांना पंधरा स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींकडून तब्बल 33,044 किलो अन्नधान्याचे वाटप झाले. याशिवाय आमदार प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी चिंचपूर, पांढरेवाडी, रोहकल, हिंगणगाव, भोत्रा, ढगपिंपरी, शेलगाव व लोहारा या गावांमध्ये किराणा साहित्याचे किट वाटप केले. वाशी तालुक्यातील जानकापुर गावात स्वयंसेवी संस्थेकडून धान्यकिटचे वाटप करण्यात आले.पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासनासोबतच समाजातील विविध संस्था आणि व्यक्ती पुढे येत असल्याने पुरबधित कुटुंबाना दिलासा मिळत आहे.

 
Top