कळंब (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदी ,नाला याला आलेल्या पुरामुळे शेती व शेतकऱ्यांचे पिके, पशुधन, तसेच शेती उपयोगी साहित्य याचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यांना या संकटातून सावरण्यासाठी मदतीची गरज आहे यासाठी विविध समाजसेवी संघटना संस्था आर्थिक तसेच जीवनावश्यक वस्तू,सामग्रीची मदत करीत आहेत. कळंब तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांनी कळंब शहरातून मदत फेरी काढून 23,600 रुपये निधी जमा केला. हा निधी वाटवडा तालुका कळंब येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम )प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक महासंघ समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, उपाध्यक्ष अच्युतराव माने, कळंब तालुका सचिव माधवसिंग राजपूत, यशवंत हौसलमल, संदीप कोकाटे यांनी सुपूर्द केला याप्रसंगी एक्साईज विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी शिवाजीराव टेकाळे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी अमृत टेकाळे, कळंब तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष ,सोमनाथ टिंगरे, बंटी टेकाळे, प्रकाश टेकाळे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे संकट निर्माण झाले आहे, महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाने या संकट समयी मदतीसाठी 21 लाख रुपये निधी जमा करून मुख्यमंत्री निधीसाठी मुख्यमंत्र्याकडे सुपूर्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे ज्येष्ठ नागरिक हा निधी जमा करीत आहेत असे सांगितले.
 
