धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव येथे 1 ऑक्टोबर 2025 रोजी मेंटल हेल्थ लॅब व छात्रमानस कक्षाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान व वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. चौहान म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि गरजू रुग्णांच्या उपचारासाठी तसेच मनोविकार विभागातील नवनवीन तंत्रज्ञान व उपकरणे प्रत्यक्ष हाताळण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे या लॅबचा निश्चितच मोठा उपयोग होणार आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून महाविद्यालय विविध उपक्रम राबवत आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य जागतिक मानसिक आरोग्य दिन (10 ऑक्टोबर) यानिमित्त साधण्यात आले.इंडियन मेडिकल असोसिएशन धाराशिवचे अध्यक्ष व मनोविकार तज्ञ डॉ.महेश कानडे यांनी यावेळी माहिती देत त्यावर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकातून मनोविकृतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.आशिष चेपुरे यांनी लॅब व छात्रमानस कक्षाची सविस्तर माहिती दिली. या वेळी उप-अधिष्ठाता डॉ. शफिक मुंडेवाडी, औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉ.उज्वला गवळी, डॉ.आशिष झरे, डॉ.राहुल जाधव,अधिसेविका सुमित्रा गोरे तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोविकृतीशास्त्र विभाग,छात्रमानस टीम व राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले.


 
Top