मुरूम(प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्रामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, वर्तमानातील प्रेरणा व भविष्यातील दिशादर्शन या तीन अंगांनी या ग्रंथात लेखकांनी विचार मांडले आहेत. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा फक्त राजकीय बदल नव्हता, तर तो जनतेच्या स्वातंत्र्याच्या उत्कटतेचा, आत्मसन्मानाचा आणि सामाजिक न्यायाच्या आकांक्षेचा लढा असल्याचे प्रतिपादन एबीपी माझा च्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांनी केले.
नळदुर्ग येथील आपलं घर सभागृहात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आयोजित डॉ. वि. ल. धारूरकर व डॉ. बि. म. कोकरे लिखित हैदराबाद मुक्तीसंग्राम मराठवाडा पर्व या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बुधवारी (ता. 17) रोजी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा हे होते. यावेळी एबीपी माझा च्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक, दै. सकाळचे माजी ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर, संयोजक डॉ. के. डी. शेंडगे रिसर्च सेंटरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर. डी. शेंडगे, सांगोला च्या प्रा. डॉ. उषा देशमुख, दिवटी सलगरा चे सरपंच जनार्दन चव्हाण, विलास वकील, प्रा. डॉ. महेश मोटे, धनराज टिकांबरे, डॉ. माधव जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कुंडीतील रोपट्यांना पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी दरिद्री विद्यालयातील विद्यार्थिनींनी मान्यवरांचे स्वागत गीताद्वारे केले. सरिता कौशिक यांच्या हस्ते हैदराबाद मुक्तिसंग्राम मराठवाडा पर्व या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
पुढे बोलताना सरिता कौशिक म्हणाल्या की, मराठवाडा हे या संघर्षाचे अग्रस्थान राहिले. हजारो क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली, समाजातील सामान्य शेतकरी, शेतमजूर, स्त्री-पुरुष यांनी एकजुटीने या आंदोलनात भाग घेतला. निजामशाहीच्या दडपशाहीला तोंड देत लोकांनी स्वराज्य, लोकशाही आणि सामाजिक समानतेसाठी लढा दिला. आज आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत, परंतु त्या काळातील बलिदान व संघर्षाची प्रेरणा वर्तमान समस्यांशी लढण्यासाठी आवश्यक आहे. हैदराबाद मुक्तीसंग्राम मराठवाडा पर्व हा ग्रंथ केवळ ऐतिहासिक नोंद नाही, तर आपल्या भविष्यासाठीचा दीपस्तंभ आहे.
या ग्रंथातून आपल्याला आठवण होते की स्वातंत्र्य हे एकदा मिळवून संपणारे ध्येय नसून ते दररोज नव्या पिढीने जपायचे असते. यमाजी मालकर म्हणाले की, सध्याच्या समाजात आपण पाहतो आर्थिक विषमता, शेतकरी व ग्रामीण भागातील संकटे, बेरोजगारी व स्थलांतर, सामाजिक सलोखा धोक्यात येणे, तंत्रज्ञानाच्या वेगवान बदलामुळे निर्माण झालेल्या नव्या आव्हानांचा सामना. अशा परिस्थितीत हैदराबाद मुक्तीसंग्रामाने दिलेला संदेश पुन्हा आत्मसात करण्याची गरज आहे. अध्यक्षीय समारोपप्रसंगी पन्नालाल सुराणा म्हणाले की, असमानतेविरुद्ध झगडण्याची हिम्मत, विविध समाजघटकांमध्ये एकजुटीचे भान, लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवून विकासाची नवी लढाई आज स्वातंत्र्याच्या अमृतकाळात खरी लढाई आहे. ती शिक्षण, रोजगार, आरोग्य, शाश्वत शेती व विज्ञान-तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्याची. लोकशाही मूल्यांचे रक्षण, विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व समान न्याय ही मूल्ये आपल्याला जपता आली पाहिजेत, कारण हीच त्या लढ्याची खरी फळे आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. डी. शेंडगे यांनी केले. सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे तर आभार रमेश दूधभाते यांनी मानले. यावेळी परिसरातील पालक, नागरिक, आपलं घर चे कर्मचारी वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.