धाराशिव (प्रतिनिधी)-  बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारण्यास इयत्ता दहावीतील मारुती शिवाजी इटलकर हा भाऊ गेला होता. मात्र त्याचा अत्यंत निर्दयपणे संबंधित आरोपींनी खून केला. खून करणाऱ्या मुख्य आरोपीस पोलिसांनी अद्यापपर्यंत अटक केलेली नाही. त्यामुळे त्या आरोपीस अटक करावी, या मागणीसाठी निवेदने, धरणे, आंदोलन व मोर्चा देखील काढला. मात्र आश्वासनाशिवाय पोलिसांनी कुठलीच भूमिका निभावली नाही. विशेष म्हणजे मुख्य आरोपी गावात मोकाट फिरत असताना देखील त्याला पोलीस पकडण्याऐवजी संबंधित पोलीस नातेवाईकांनाच त्या आरोपींना पकडून द्या, असे फर्मान सोडत आहेत. त्यामुळे वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आजचा आठवा दिवस असल्याने उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, आमरण उपोषण तात्काळ थांबवा असा दबाव पोलीस आणत आहेत. त्यामुळे जर आरोपीस अटक करण्यास टाळाटाळ केली तर संबंधित पीडित कुटूंब सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा इटलकर नातेवाईकांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव शहरातील बालाजी नगर येथील शिवाजी सीमाप्पा इटलकर यांच्या मुलीची त्या गल्लीतील सागर प्रवीण चौधरी हा सतत छेड काढत होता. त्याचा जाब तिचा एकुलता एक भाऊ असलेल्या मारुती इटलकर या भावाने विचारला. त्यामुळे मारुतीस गणेश किराणा स्टोअर समोर प्रवीण सुभाष चौधरी, किशोर सुभाष चौधरी, सिद्धनाथ सावंत, अंकुश सुभाष चौधरी, सागर सुभाष चौधरी, रणजीत सुभाष चौधरी व अज्ञात दोन व्यक्तींनी संगणमताने कट रचून मारुतीस दि.8 मे 2025 रोजी जबर मारहाण केली. त्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

या उपोषणामध्ये शिवाजी इटलकर यांच्यासह आशा इटलकर, महादेव इटलकर, अनुराधा इटलकर, सानिया इटलकर, पूजा इटलकर, आरती इटलकर, कविता इटलकर,मनीषा इटलकर, छकुली इटलकर, तनुजा इटलकर व बजरंग इटलकर आदी सहभागी झाले आहेत.

 
Top