वाशी (प्रतिनिधी)- धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची चांगली ओळख असून या ओळखीने सरकारी काम मिळवून देतो म्हणत भूम तालुक्यातील पाथरूड येथील एका व्यक्तीने भूम येथील व्यक्तीची तब्बल सहा लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी गणेश सतिश चव्हाण (रा.पाथरुड ता. भूम) यांनी दिनांक 13 जानेवारी 2025 ते 4 फेब्रुवारी 2025 या काळात मोबाईलवरुन फिर्यादी प्रशांत सतिश नाईकवाडी (वय 35 वर्षे, रा. भूम) यांना पालकमंत्री प्रताप सरनाईक हे माझ्या चांगले ओळखीचे आहेत असे सांगितले.
गावातील केलेली कामे दाखवून जिल्हा नियोजन समिती मधून कामे मंजूर करुन देतो असे म्हणून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. पुढे आरोपीने फिर्यादीला कोणतेही शासकीय काम मिळवून न देता फिर्यादीकडून वेळोवेळी एकुण 5,95,000 रुपये ऑनलाईन घेवून फिर्यादीची फसवणुक केली. तसेच पैसे परत मागीतले असता जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी प्रशांत नाईकवाडी यांनी दिनांक 28 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318(4), 351 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.