धाराशिव (प्रतिनिधी)-  राज्यासह मराठवाड्यातील अनेक भागांवर कोसळलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती, पशुधन आणि घरांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी जनता सहकारी बँक लि., धाराशिव यांनी पुढाकार घेत एकूण 30 लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे.

बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रातील धाराशिव, लातूर, सोलापूर, बीड तसेच कर्नाटकातील बीदर जिल्ह्यांपर्यंत पसरलेले आहे. धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे पीकहानी, जनावरांचे मृत्यू व घरांची पडझड झाली आहे. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन बँकेच्या संचालक मंडळाने त्वरीत बैठक घेऊन मदतीचा निर्णय घेतला. निर्णयानुसार, धाराशिव जिल्ह्यासाठी 10 लाख तर लातूर, सोलापूर, बीड आणि बीदर या प्रत्येक जिल्ह्यासाठी 5 लाख रुपये असे एकूण 30 लाख रुपयांचे धनादेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्याचे ठरले.

धाराशिव जिल्ह्यासाठीचा 10 लाखांचा धनादेश बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, संचालक विश्वास शिंदे, संचालक आशिष मोदाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके व मुख्याधिकारी शिवाजी बुडुपे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. “संकटसमयी समाजाने एकदिलाने उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. पूरग्रस्तांना मदत करून त्यांच्या पुनर्वसनाला हातभार लावणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जनता सहकारी बँकेच्या या दानशूर उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, समाजातील इतर संस्था व नागरिकांनाही मदतीसाठी प्रेरणा मिळत आहे.

 
Top