मुरुम (प्रतिनिधी)- शहरातील यशवंतनगर परिसरातील उडचणे प्लॉट भागातील असंख्य महिलांनी सोमवारी (ता. 29) रोजी आपल्या जगण्याशी निगडित असंख्य समस्या घेऊन नगरपरिषदेवर हल्लाबोल मोर्चा काढला. सामाजिक कार्यकर्ते सिद्धलिंग हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली हलगीच्या निनादात घागरी हातात घेऊन निघालेल्या या मोर्चात परिसरातील रस्ते, शुद्ध पाणी, वीजपुरवठा, तुंबलेल्या गटारी, औषध फवारणी, तसेच उपलब्ध विजेच्या खांबांवर दिवे बसवावेत अशा प्रमुख मागण्या महिलांनी जोरदारपणे मांडल्या. मोर्चा नगरपरिषद कार्यालयावर दाखल होताच महिलांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शविला. यावेळी महिलांनी संतप्त स्वरात सांगितले की, आम्ही दिवसभर शेतीकाम करून कुटुंबाचा गाडा चालवतो. एक दिवस मजुरी नाही केली तर कुटुंब उपाशी राहते. अशा परिस्थितीत शुद्ध पाणी, रस्ते, वीज अशा प्राथमिक सोयीही मिळत नसल्याने जगण्याची लढाई अधिक कठीण होत आहे. अनेकदा तक्रारी केल्या तरी आज-उद्या काम करू असे सांगून आम्हाला उडवा-उडवी ची उत्तरे दिली जातात परंतु प्रत्यक्षात काहीही काम होत नाही. दरम्यान, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक विशाल अमृतराव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, उडचणे प्लॉटचा मागील लोकवस्ती भाग नगरपरिषदेच्या हद्दीत नसला तरी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अहवाल मिळाल्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी सुद्यान हिप्परगे, सुलताना शेख, मंगल जाधव, विजया कुंभार, रुकिया कारभारी, शाहीन पाटोदे, बानुबी पटेल, वाशिमा मासूलदार सारिका बोळे, फातिमा महाबुसे, आसमा शेख, नजबुलबी शेख, उषाबाई आळंगे, अश्विनी मडोळे, सुजाता सूर्यवंशी, शफिका शेख, सोनाबाई सुरवसे, असलम महाबुसे, तेजस शिंदे, बालाजी माने, कन्हैया भोकले, अमोल कदम, गुंडू माने, बाळू वाघमारे, हणमंत मांडले, अंकुश वाळके, गिरजाप्पा शिंदे, शिवाजी जाधव, राम कांबळे, सुरेश गायकवाड आदि असंख्य नागरिक उपस्थित होते.
या भागातील अडचणी गंभीर असून नागरिकांचा संताप वाढला आहे. नगरपरिषदेकडून तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास येत्या काळात त्यापेक्षा तीव्र आंदोलन उभारले जाईल.
सिद्धलिंग हिरेमठ (सामाजिक कार्यकर्ते)